Friday, 4 March 2016

असाही एक रचनावाद....!!

असाही एक रचनावाद....!!

......ओढाळ पाखरांसवे स्वच्छंदपणे विहार करणार्या चिमुकल्यांच्या मनी कोण जाणे काय कल्पना येईल ह्याचे एकाएकी निदान करणे अवघडचं..! फावल्या वेळात आज वर्गातील काही मुली कैची, कापडाच्या चिंद्या, सुई दोरा घेवून काही तरी करतांना दिसल्या. मी हळुच काय करत आहे म्हणुन सहज त्यांच्या करामतीच्या मैफिलीत आगंतुक पणे गेलो. थोड्या बिथरल्या सावराआवर करत एकमेकींकडे बघत गालातच हसायला लागल्या. म्हटलं अगं चालु द्या तुमचं...छान आहे..! करत रहात जा काहीतरी.. हो सर....म्हणत त्या आपल्या  कामात पुन्हा मग्न झाल्या. माझं लक्ष त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या कारभाराकडे होतचं.. काही वेळा नंतर त्यांना विचारलच अगं काय करत आहात सांगाल की आम्हालाही थोडं..... असं म्हणताच एक दोघी लगेच धावत माझ्या कडे आल्या व त्यांनी बनवलेले साहित्य घेवुन आल्या... तर पाहतो तर काय हाताने शिवलेल्या कापडाच्या छोट्या मोठ्या छान पिशव्या....! अरेव्वा छानचं.. व्हेरी गुड गर्ल ईन द वर्ल्ड.! म्हणुन त्यांना शाबासकी दिली.. पण तेवढ्याने होतेय काय कुण्या गुर्जीचं...! पुन्हा प्रश्न केलाच... म्हटलं... अगं पण हे कशासाठी केलं त्यामागे काही उद्देश आहे की, उपक्रम म्हणुन ठेवुन द्यायचा... त्यावर स्नेहलने दिलेलं उत्तर ऐकून लहान मुलांच्या सच्चा निष्ठेचं, शाळेवरील प्रेमाचं करावं तितकं कौतुक कमीच ठरलं असतं. ती म्हणाली सर आपल्या शाळेच्या शौचालयातील हॅंडवाश लिक्विड संपले होते. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, आपणच आपल्या पैशाने एक हॅंडवाश लिक्विड आणायचे..... म्हणुन ह्या छोट्या छोट्या पिशव्या आम्ही तयार करून एक एक रुपयाला विकतो आहे. आणि पैसे गोळा झाले की, घेवुन येऊ लगेच.....! अच्छा म्हणुन हा खटाटोप चालु होता काय..! अरे व्वा तुमच्या समजदारीला तोड नाही मुलींनो.. सर्वांपुढे त्यांचं स्वागत घेवुन त्यांची एक सेल्फि घेतली.....!!!!!!
   -किशोर तळोकार 9673060762